Sangli Accident News | दुचाकीला बिबट्या धडकल्याने जखमी व्यक्तीचा मृत्यू

सांगली : Sangli Accident News | रेठरेधरण तलावाजवळील ओढ्याच्या पुलावर बिबट्या रस्ता ओलांडताना धावत्या दुचाकीला धडकला होता. या अपघातात दुचाकीस्वार सर्जेराव मारुती खबाले (वय-४५, रा-कापरी, ता- शिराळा) हे जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान कराड येथे गुरुवार (दि.१९) मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.१६) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सर्जेराव खबाले हे दुचाकीवरून (एमएच १० डीसी १८१३) पेठकडून शिराळ्याच्या दिशेने चालले असताना रेठरेधरण तलावाच्या ओढ्याच्या पुलावर पूर्वेस असणाऱ्या उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने अचानक पश्चिमेच्या बाजूला झेप घेतली.
यावेळी तो बिबट्या खबाले यांच्या दुचाकीला धडकला आणि ते दुचाकीसह रस्त्यावर पडले. डोक्याला जबर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कराड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.
याबाबतची माहिती मिळताच आमदार सत्यजित देशमुख, उपवनसंरक्षक नीता कट्टे, सहायक उपवनसंरक्षक अजित साजने, वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, वनपाल डी.बी. बर्गे, विशाल दुबल यांनी कराड येथील रुग्णालयात भेट दिली. मात्र उपचारादरम्यान सर्जेराव खबाले यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.