Lohegaon Pune Airport News | पुणेकरांच्या हवाई प्रवासाची विक्रमी भरारी, दररोज हवेत झेपवताहेत 200 विमाने

पुणे : Lohegaon Pune Airport News | लोहगाव येथील नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विमानांची संख्यादेखील वाढली आहे. शनिवार, रविवार तर तब्बल २०० पेक्षा जास्त विमान उड्डाणे होत आहेत शिवाय पुण्यातून देशातील ३५ विमानतळांसह ३ आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पाच महिन्यांपूर्वीच नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणे सुरू करण्यात आले. सुरुवातीला जुन्या टर्मिनलवरून नव्या टर्मिनलवर दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्यांने विमानांची संख्या वाढविण्यात आली तसेच दैनंदिन विमान उड्डाणांची संख्या साधारणपणे १९० पर्यंत असून, शनिवार, रविवार यांची संख्या वाढत आहे.
पुण्यातून पूर्वी दैनंदिन १५० ते १६० विमानांचे उड्डाण होत होते. त्यामुळे प्रवाशांची संख्या त्यावेळी २० ते २५ हजार इतकी होती. मात्र, सध्या पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढल्याने दैनंदिन ३० हजारांच्या पुढे प्रवासी येथून प्रवास करीत आहेत.
पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेंतर्गत नव्या सहा ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आले आहे. याशिवाय अहमदाबाद, चेन्नई, भोपाळ या ठिकाणी उड्डाणांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे प्रवाशांना हवाई प्रवास सोयीचा झाला आहे.
उड्डाणामुळे पुण्यातून १ हजार १८० विमान उड्डाणे झाले आहेत. त्यातून ६९ हजार ६४६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुण्यातून सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनघर, भावनगर, प्रयागराज या शहरांसाठी ही विमाने सुरू आहेत.