Latur Crime News | सततची नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

लातूर : Latur Crime News | देवणी तालुक्यातील इस्मालवाडी येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सोमेश्वर खंडू मुगळे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. भालकी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Farmer Suicide)
सोयाबीनचे घटलेले बाजारभाव, गेल्या तीन वर्षापासूनची दुष्काळी स्थिती, सततची नापिकी, या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे वाया गेलेला खरीप हंगाम, खर्च अन् उत्पन्नाचा न बसत असलेला मेळ, कर्जाचे वाढत चाललेले चक्र यामुळे इस्मालवाडी गावातील तरुण व उमद्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. दोन एकर शेतीत कुंटुबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा अन् तीन लेकरांचे शिक्षण त्यांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या या विवंचनेतून दोन दिवसांपूर्वी ते घरातून निघून गेले होते. कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता गुरुवार (दि.१९) भांतब्रा (ता. भालकी, जि. बिदर) येथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.