Swargate Pune Crime News | जाब विचारल्याने टोळक्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; सोलापूरला पळून जाणार्या गुंडाला स्वारगेट पोलिसांनी पकडले

पुणे : Swargate Pune Crime News | मित्राला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील सराईत गुंड (Criminal On Police Record) सोलापूरला पळून जात असताना स्वारगेट पोलिसांनी एस टी स्टॅन्डला (Swargate ST Stand) पकडले.
याबाबत समर्थ राकेश सांळुखे (वय १८, रा. संतोषनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सोन्या कांबळे, अमोल आडाम, अमोल मदनकर, गणेश दोडमणी, चिक्का व इतर दोन अनोळखी यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रज येथील साईनगरमध्ये १७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र इशांत कोकाटे याला आरोपींनी मारहाण केली होती. त्याना जाब विचारण्यासाठी हे दोघे गेले होते. त्यावेळी सोन्या कांबळे याने तू आम्हाला जाब विचारणारा कोण, असे म्हणून त्याने साथीदारांना इशारा करुन बोलावून घेतले. त्याप्रमाणे सर्व जण कोयते घेऊन आले. सोन्या कांबळे याने इशांत कोकाटे याच्या मानेवर वार केला. तो खाली कोसळल्यावर फिर्यादी व त्याचे साथीदार जीव वाचविण्यासाठी पळू लागले. त्यावेळी समर्थ साळुंखे याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. तेव्हा त्याचा पाठलाग करणार्या गुंडांनी त्याच्या डोक्यावर, हातावर व अंगावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला.
स्वारगेट पोलीस ठाण्यातील हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार राहुल तांबे यांना बातमी मिळाली की, सच्चाई माता मंदिर येथे झालेल्या खुनाचा प्रयत्नातील आरोपी अमोल आडम हा सोलापूरला पळून जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट एस टी बसस्थानकावर सापळा रचला. सोलापूरला जाण्यासाठी आलेल्या अमोल रवी आडम (वय २४, रा. शंकरनगर, कात्रज) याला पकडले. अमोल आडम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर भारती विद्यापीठ, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा या पोलीस ठाण्यांमध्ये अपहरण, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत यासारखे अतिगंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो स्थानबद्धतेतून सुटून आला होता. गुन्हा दाखल होताच तो पुन्हा फरार होत असताना पोलिसांनी त्याला पकडले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोळंबीकर, सहायक फौजदार संजय भापकर, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, शंकर संपते, सागर केकाण, राहुल तांबे, श्रीधर पाटील, सुधीर इंगळे, सतीश कुंभार, विक्रम सावंत, रफीक नदाफ, शरद गोरे यांनी केली आहे.