Pune Cyber Crime News | पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला 4 कोटीला गंडा घालणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

दुबईला गेलेल्या अध्यक्षांच्या नावाने टेक्स्ट मेसेज पाठवून केली होती फसवणूक

पुणे : Pune Cyber Crime News | शहरातील एका नामवंत बांधकाम व्यावसायिक कंपनीचे अध्यक्ष दुबईला गेले असताना त्यांच्या नावाने टेक्स्ट मेसेज पाठवून वेगवेगळ्या लोकांना आरटीजीएस (RTGS) करायला सांगून तब्बल ४ कोटी ६ लाख १७ हजार ३१६ रुपयांना गंडा घालणार्‍या सायबर ठगीला वर्षभराच्या प्रयत्नांनंतर पकडण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. (Cheating Fraud Case)

सानिया ऊर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी Sania alias Gudiya Mohammad Mustaqeem Saheb Siddiqui (वय २१, रा. लोहरपत्ती, गोपालगंज, बिहार) असे तिचे नाव आहे. गेले वर्षभर ती आपले अस्तित्व लपवून वेगवेगळे मोबाईल नंबर वापरुन राहत होती.

या प्रकरणी बांधकाम कंपनीतील ४१ वर्षाच्या उप सर व्यवस्थापक (अकाऊंटस) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार २५ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान घडला होता. (Pune Cyber Crime Branch)

फिर्यादी यांना २५ जानेवारी रोजी कंपनीच्या अध्यक्षांच्या नावाने टेक्स्ट मेसेज मिळाला. तसेच व्हॉटसअ‍ॅपवर मेसेज आला होता. हा प्रायव्हेट नंबर असून तो कोणाला शेअर करु नका. मी सध्या मिटिंगमध्ये असल्याने कॉल करु शकत नाही. मी बेनिफिशिअरी बँक खात्याची माहिती पाठवत आहे. त्यामध्ये आरटीजीएस करुन त्यांचा युटीआर नंबर मला लवकरात लवकर पाठवून द्या. त्यानंतर त्याच्या मेसेजमध्ये मी फ्री झाल्यानंतर सगळ्या फॉरमॅलिटीज पूर्ण करेल, असे लिहिले होते. आपल्या अध्यक्षांचाच मेसेज आहे, असे वाटल्याने फिर्यादी यांनी आरटीजीएस करुन मेसेज पाठविला. त्या नंबर वरुन ज्यांना ज्यांना पैसे पाठविण्यास सांगितले जात, त्यांना फिर्यादींनी २९, ३० जानेवारी, १, २ आणि ४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी पैसे पाठविले. अध्यक्ष ४ फेब्रुवारी रोजी दुबईहून पुण्यात आल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या नेहमीच्या मोबाईलवर कॉल करुन सांगितले. तेव्हा त्यांनी आपण कोणताही व्हॉटसअ‍ॅप मेसेज करुन पेमेंट करावयास सांगितले नसल्याचे सांगितले. तेव्हा आपली ४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (Pune EoW)

या सायबर ठगीला सायबर पोलीस पथकाने फेब्रुवारी २०२४ मध्ये फरीदाबाद येथून ताब्यात घेतले होते. रेल्वेने पुण्याला आणत असताना ती कोटा रेल्वे स्थानकावरुन पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळून गेली होती. त्यानंतर तीचा ठावठिकाणा लागत नव्हता.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण केल्यावर ही ठगी दिल्लीत असल्याचे माहिती मिळाली. त्यावर सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कदम, हवालदार सीमा सुडीत, निलम साबळे, संदीप पवार, सचिन शिंदे यांचे पथक दिल्लीला गेले. दिल्ली पोलिसांच्या मदतीने जामीयानगर भागात तिचा शोध घेतला. तेथे मिळालेली माहिती आणि पोलीस अंमलदार अश्विन कुमकर यांना बिहारमधील सिवान येथून मिळालेल्या माहितीत सानिया ही गोपालगंज भागात असल्याचे समजले. त्याबरोबर हे पथक तातडीने बिहारमधील गोपालगंज येथे गेले.

वेशांतर करुन शेतात मुक्काम

गोपालगंज येथे पोहचल्यावर सानिया रहात असलेले ठिकाण पोलीस पथकाने शोधून काढले. त्यावेळी ती घरात नव्हती. तेव्हा या पथकाने वेशांतर करुन रात्रभर शेतात मुक्काम केला. तिने घरात प्रवेश केल्यावर पथकाने छापा घातला. तेव्हा तिने घराच्या छतावरुन उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने चारही बाजूने घेराव घातला असल्याने तिला शिताफीने पकडून अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदिप कदम, पोलीस अंमलदार सीमा सुडीत, नीलम साबळे, पोलीस अंमलदार मुंढे, कोंडे, संदिप पवार, सचिन शिंदे, दिनेश मरकड, अश्विन कुमकर, नागटिळक, स्वागत पळसे यांनी केली आहे.