Sanjay Kakade | संजय काकडे अन् त्यांच्या कंपनीला हायकोर्टाचा दणका; २० लाख रुपयांचा दंड; लवादाच्या निर्णयाविरोधातील अपील फेटाळले

पुणे : Sanjay Kakade | राज्यसभेचे माजी खासदार व काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे (Kakade Construction Company) संचालक संजय काकडे आणि उषा काकडे (Usha Kakade) या दाम्पत्यासह त्यांच्या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांनी विस्ट्रा आयटीसीएल (इंडिया) व आयआयआरएफ होल्डिंग्ज कंपनीसह (Vistra ITCL (India) and IIRF Holdings Company) व्यावसायिक लवादाच्या निर्णयाविरोधात केलेले अपील फेटाळून लावले आहे.

काकडे दाम्पत्याचे अपील ग्राह्य धरण्यायोग्य नसून, त्यांनी आदेशाच्या तारखेपासून चार आठवड्यात विस्ट्रा आयटीसीएल (इंडिया) व आयआयआरएफ होल्डिंग्ज कंपनीला १० लाख रुपये आणि राज्य सेवा विधी प्राधिकरणाला १० लाख रुपये द्यावेत, असा आदेश न्यायमूर्ती एम. एस. सोनक (Justice M.S. Sonak) व न्यायमूर्ती जितेंद्र जैन (Justice Jitendra Jain) यांच्या खंडपीठाने १४ डिसेंबर रोजी दिला आहे.

काकडे दाम्पत्य संचालक असलेल्या काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि विस्ट्रा आयटीसीएल (इंडिया) (पूर्वाश्रमीची आयएल अँड एफएस कंपनी) व आयआयआरएफ होल्डिंग्ज या कंपन्यांमध्ये काही आर्थिक करार झाले होते. त्यात वाद उद्भवल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले.

लवादात उभय पक्षांमध्ये तडजोड़ झाली. त्यानुसार, काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने विस्ट्रा व आयआयआरएफ कंपनीला १७८ कोटी रुपये द्यावे, असा आदेश लवादाने १४ जुलै २०१४ मध्ये दिला. याच्या अंमलबजावणीसाठी विस्ट्रा व ‘आयआयआरएफ’ ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र, या निर्णयामुळे परकीय चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून काकडे दाम्पत्याने लवादाच्या निर्णयाच्या वैधतेबाबत उच्च न्यायालयात अपील केले होते.