Bapu Pathare MLA | हिवाळी अधिवेशनात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी मांडले सरकारपुढे महत्त्वाचे प्रश्न

पुणे : Bapu Pathare MLA | नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात वडगावशेरी विधानसभेचे (Vadgaon Sheri Assembly) आमदार बापूसाहेब पठारे यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न ठामपणे सरकारकडे मांडले. यामध्ये लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा केंद्रस्थानी होता.

ससून रुग्णालयावरील वैद्यकीय ताण कमी करण्यासाठी व वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने, हे उपजिल्हा रुग्णालय लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी मागणी त्यांनी अधिवेशनात केली.

या संदर्भात आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “यापूर्वीही मी हे उपजिल्हा रुग्णालय सुरू व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मात्र, ज्या अडथळ्यांमुळे हे काम रखडले आहे, त्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी. उपजिल्हा रुग्णालय २०१३ मध्ये मंजूर करण्यात आले होते. परंतु, अद्यापही हे रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरू झालेले नाही. “यावर्षी तरी ते रुग्णालय सुरु होईल का? व वडगावशेरी मतदारसंघातील गोरगरीब जनतेला न्याय मिळेल का?” अशी विचारणा त्यांनी यावेळी सरकारकडे केली.

मतदारसंघातील चार मैदाने व पाच गार्डनसाठीची जागा महानगरपालिकेच्या ताब्यात असूनही त्यासाठी महानगरपालिकेकडून बजेट उपलब्ध झाले नाही ते उपलब्ध करून द्यावे. त्याबरोबरच, नगर रोडवरच्या वाढत्या वाहतूक समस्येबाबत चिंता व्यक्त करत ट्रॅफिक नियोजनावर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपयोजना कराव्यात.

त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी जोरकसपणे मांडली. “शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा दर मिळणे आवश्यक असून सरकारने या बाबतीत ठोस पावले उचलावीत,” या मागण्या पठारे यांनी अधिवेशनात सरकारकडे केल्या.