Pune Book Fair | रिक्षात विसरलेल्या ‘अनमोल ठेवा’ याची गोष्ट पुणे पुस्तक महोत्सवात उलघडली

पुणे : Pune Book Fair | रिक्षामध्ये घाईगडबडीत अनेकांच्या वस्तू राहतात. काही वेळा रिक्षाचालकांच्या हे लक्षात आल्यावर ते स्वत: आणून देतात. काही वेळा पोलिसांच्या मदतीने रिक्षाचालकाचा शोध घेऊन प्रवाशांच्या वस्तू परत मिळवून दिल्या जातात. पुणे पुस्तक महोत्सवात अशीच एक ‘अनमोल ठेवा’ असलेली गोष्ट उलघडली गेली.
पुणे पुस्तक महोत्सवातून घरी जाताना रात्री या ज्येष्ठ नागरिकांची ‘अनमोल ठेवा’ असलेली पिशवी रिक्षातच राहिली. काही वेळात रिक्षाचालकाचा त्यांना फोन आला. त्याने तुमची पिशवी रिक्षात राहिल्याचे सांगितले. तुमच्या पिशवीत जाहिरातीसारखे पत्र होते, त्यावरील नंबरवरुन तुम्हाला कॉल केला. दुसर्या दिवशी रिक्षाचालकाने तो ठेवा पुस्तक महोत्सवाच्या गेटवर परत केला. तेव्हा आपल्या आयुष्यभराचा ठेवा परत मिळत असल्याचा पाहून त्यांना रडु कोसळण्याच्या बेतात होते. या गडबडीतच ते परत महोत्सवात जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपला मोबाईल रिक्षात राहिला. गेटवर असलेले पोलीस उपनिरीक्षक राजेश लोणकर, सुभाष सुद्रिक व इतरांनी त्यांच्या मोबाईलवर परत परत कॉल केला. तेव्हा रिक्षाचालक युनुस पठाण यांनी रिक्षातील मोबाईल उचलला आणि तो पुन्हा परत येऊन मोबाईल दिला.
आपल्याकडील या ‘अनमोल ठेवा’ विषयी सतीश पेंढारकर (वय ७४) यांनी सांगितले की, आपण २६ -२७ वर्षाचे असल्यापासून मराठीतील ज्येष्ठ लेखक, साहित्यिक, कवी यांच्याशी संपर्क साधत असतो. त्यांचा संदेश आणि सही घेतो. असे जवळपास १०० हून अधिक साहित्यिकांचे संदेश व सह्या यांचा संग्रह केला आहे. त्यातील ५२ नामवंताचे सही, संदेश लॅमिनेशन करुन ठेवले आहे. त्यांचे प्रदर्शन मी शाळांमध्ये घेऊन जातो.
लोकांना त्या त्या लेखकांची माहिती देतो, मुलांकडून येणार्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांची मराठी साहित्यिकांविषयीची जिज्ञासा वाढवितो. पुणे पुस्तक महोत्सवात गेली ६ दिवस हे प्रदर्शन भरवित आहे. इतरांच्या दृष्टीने या फक्त सह्या असतील, पण माझ्या आयुष्यातील हा ‘अनमोल ठेवा’ आहे़ आणि हा ‘अनमोल ठेवा’ रिक्षाचालकाने स्वत:हून परत आणून दिला.