Sinhagad Road Pune Crime News | सोनाराच्या दुकानात खरेदी बहाण्याने चोरी करणारा चोरटा जेरबंद; चार गुन्ह्यातील पावणे चार लाखांचा ऐवज हस्तगत

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | सोनाराच्या दुकानात खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन सोनसाखळी चोरुन नेणार्‍या चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

कपिल जयराम चव्हाण Kapil Jayram Sharma (वय ३९, रा. रामचंद्र स्मृती बिल्डिंग, शास्त्रीनगर, कोथरुड) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५ सोनसाखळ्या व गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा ३ लाख ६४ हजार ४८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सिंहगड रोडचे २ आणि चतु:श्रृंगी व वारजे माळवाडी येथील प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

सिंहगड रोडवरील धायरी येथील सराफी दुकानांमध्ये एकाने सोन्याची चैन खरेदी करण्याचा बहाणा करुन ती गळ्यात घालून दुकानदाराची नजर चुकवून तो पसार झाला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त संभाजी कदम व सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या आदेशाने दोन तपास पथके तयार केली. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार तारु, क्षीरसागर, मोहिते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोनाराच्या दुकानात चोरी करणारा चोरटा कोथरुड परिसरात आहे. त्यादृष्टीने पोलीस पथक कोथरुडमध्ये शोध घेत होते. एका संशयिताला पोलिसांनी पकडले. त्याने कपिल चव्हाण असे नाव सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने धायरीत चोरी केल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याच्याकडून ४ गुन्ह्यातील ५ सोनसाखळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, विकास बांदल यांनी केली आहे.