FIR On Sankalp Gole | ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्याचे गायक संकल्प गोळे विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल

बारामती : FIR On Sankalp Gole | ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्याचे गायक संकल्प गोळे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) कौटुंबिक हिंसाचाराचा (Domestic Violence) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांची पत्नीने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती संकल्प गोळे, सासू शोभा अजाबराव गोळे, सासरे अजाबराव मारुती गोळे, नणंद समिक्षा अजाबराव गोळे, दिक्षिता स्वप्निल जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ५ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली. संकल्प यांचा विवाह काळज (ता. फलटण, जि. सातारा) येथे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. लग्नानंतर एक महिना संसार व्यवस्थित सुरु होता. परंतु त्यानंतर पती संकल्प हे दारु पिवून येत पत्नीवर संशय घेवू लागले.
तु काम व्यवस्थित करत नाही, तु कोणाबरोबरही चॅटींग करते, बोलते. तुला घरकाम येत नाही. तु तुझे बारामतीतील मेडिकल शॉप बंद करून पुणे येथे सुरु कर अन्यथा तुला नांदवणार नाही, असे ते म्हणत. शिवाय तुला नांदवायचे नाही, तू मला घटस्फोट दे, असे म्हणत तिला हाताने मारहाण, शिवीगाळ दमदाटी केली जात होती.
सासू शोभा यांनी ‘तू मला उलट बोलतेस, तुला नांदवायचे नाही’ असे म्हटले. तर ‘समिक्षाच्या लग्नासाठी दहा तोळे दागिने माहेरहून आण’ अशी मागणी सासूने केली. सासरे यांनीही मेडिकल शॉप पुण्यात सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आण असे म्हणत उपाशीपोटी ठेवून शारिरिक व मानसिक छळ केला.
नणंद समिक्षा व दिक्षिता यांनीही सतत शिविगाळ, दमदाटी केली. लग्नावेळी घातलेले दागिने सासरच्या मंडळींनी काढून घेत तिला फेब्रुवारी २०२४ मध्ये राहत्या घरातून हाकलून दिले. त्यामुळे फिर्यादीने बारामतीत बहिणीच्या घरी आसरा घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.