Bhima Koregaon Shaurya Din | पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : Bhima Koregaon Shaurya Din | पेरणे फाटा (Perne Phata Pune) येथे 1 जानेवारी 2025 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता विविध ठिकाणावरुन येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी संबंधित विभागांनी उत्तम नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwase) यांनी दिले.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तथा बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, येत्या 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता 31 डिसेंबर 2024 व 1 जानेवारी 2025 या कालवधीत येणाऱ्या अनुयायांकरीता अधिक मेट्रोसेवा उपलब्ध करुन देण्यात यावी. गेल्या वर्षापेक्षा या वर्षी बससेवाअंतर्गत बसेसची संख्या वाढविण्यात आली आहे. येणाऱ्या अनुयायाकरीता रस्त्यालगत विश्रांतीगृह कक्ष स्थापन करावे. कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक कोंडी निर्माण होवू नये याकरीता नियोजन करावे. जागो जागी सर्व सुविधांबाबत विविध रंगाचे माहिती फलक लावावे.

संपूण परिसरात स्वच्छता ठेवण्याकरीता विशेष प्रयत्न करावे तसेच वीजपुरवठा अखंडीतपणे सुरू ठेवण्यात यावा. परिसरात मदत केंद्र, नियंत्रण कक्षाची स्थापना करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध करुन देण्यात याव्यात, कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात संबंधित विभागानी समन्वय ठेवून कामे करावीत, अशा सूचना डॉ.दिवसे यांनी दिल्या.

यावेळी विजयस्तंभ परिसराचे सुशोभिकरण, पुरेशी प्रकाशव्यवस्था, स्टॉल, मंडप उभारणी, वाहनतळ, वाहतूक आराखडा, आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, रस्त्यांची दुरुस्ती, तात्पुरते शौचालय उभारणी, स्वच्छतेसाठी घंटागाड्या, आपत्तकालीन प्रसंगी अग्नीशमन वाहनांची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन आदींबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.