Swargate Pune Crime News | पुणे: इमानदारी ! रिक्षाचालकाने साडेआठ तोळे सोने केले परत; पोलिसांकडून रिक्षाचालकाचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान

12th December 2024

पुणे : Swargate Pune Crime News | शहरातील रिक्षाचालकाने साडेआठ तोळे सोने असलेली प्रवाशी महिलेची बॅग परत केल्याने त्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. राजाभाऊ चंद्रकांत रासकर (Rajabhau Chandrakant Raskar) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाभाऊ हे पानमळा ते स्वारगेट येथे प्रवासी घेऊन जात असताना एका महिलेची साडेआठ तोळे सोने असलेली बॅग रिक्षामध्ये मंगळवार (दि.१०) सकाळी ८ वाजताच्या सुमारास विसरली. त्यानंतर रिक्षा सदाशिवपेठेत गेल्यानंतर रिक्षाचालकाच्या ते लक्षात आले. (Swargate Police)

त्यानंतर रासकर यांनी ती बॅग घेत थेट स्वारगेट पोलिस चौकी गाठली. मात्र, तोपर्यंत स्वारगेट पोलिस ठाण्यात ग्राहकाने बॅग हरवल्याची तक्रार नोंद केली होती. त्यानंतर महिलेला बोलावून घेण्यात आले.

बॅग चौकीत घेऊन गेल्यानंतर त्यामध्ये साडेआठ तोळे सोने असल्याचे पोलिसांनी रासकर यांना सांगितले. प्रवाशी महिलेला बोलावून पोलिसांनी ती बॅग तपासली. त्यानंतर सर्व ऐवज जशास तसा होता. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने ती बॅग आणि त्यातील सर्व ऐवज हा प्रवाशी महिलेच्या ताब्यात देण्यात आला.

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून स्वारगेट पोलिसांकडून रासकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वारगेट (नेहरु स्टेडियम) पोलीस चौकीचे पोलीस उपनिरिक्षक बाळू पोपट सिरसट, पोलिस अंमलदार अमोल काटे, प्रभाकर सोनवणे उपस्थित होते.

रिक्षाचालक राजेश रासकर म्हणाले, ” कोणाच्याही वस्तूला हात लावायचा नाही, अशी आमची शिकवण आहे. त्यानुसार त्या बॅगेत काय ऐवज आहे हे मला माहितीही नव्हते. बॅग रिक्षात राहिल्यावर ती परत करण्याच्या उद्देशाने मी स्वारगेट पोलिस चौकीत जाऊन जमा केली. मात्र, तिथे गेल्यानंतर कळले की त्यामध्ये साडेआठ तोळे सोने होते. पोलिसांनीही माझा सन्मान करुन एक आदर्श घातला आहे. त्यामुळे चांगल्या कामाची पोचपावती मिळाल्याचा आनंद आहे.”