Arbaaz Pathan Death Case | पैलवान अरबाज पठाण मृत्यूप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे; ३० दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

करमाळा : Arbaaz Pathan Death Case | केडगाव येथील युवा पैलवान अरबाज महंमद पठाण यांच्या तपासावरून मुंबई हायकोर्टाने करमाळा पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. अरबाज याचा अपघात नसून घात झाल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त केला जातोय. मात्र या प्रकरणाकडे गांभीर्याने न बघता हा अपघातच आहे असे अनुमान करमाळा पोलिसांनी केले होते. यासंदर्भात मृताचे वडील महमंद गफूर पठाण यांच्या वतीने ऍड. सचिन देवकर व ऍड. अलिम हामजेखान पठाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. (Bombay High Court)

या प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. अरबाज पठाण यांच्या मृत्यूबाबत पुन्हा एकदा सखोल चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज, सी.डी.आर व अन्य पुरावे गोळा करून ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करणेबाबत जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) व करमाळा पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले आहेत . तसेच या गुन्ह्याच्या तपासाच्या अहवालासह करमाळा पोलीस व जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) यांना मुंबई उच्च न्यायालयात समक्ष हजर राहणेबाबतही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

याबाबत याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले, अरबाज पठाण याच्या मृत्युप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मृताच्या आई वडिलांसह ग्रामस्थांनी अरबाजचा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी करमाळा तहसिल कार्यालय व पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चे काढत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे याप्रकरणाचा जलद गतीने तपास करावा, अशी मागणी केली होती.

परंतु पोलिसांनी यावर कुठलीही दखल घेतली नाही. त्यानंतर मृतांच्या वडिलांनी मुलाच्या घातपाताच्या संशयावरून सखोल तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करून सुनावणीवेळी करमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांना सदर गुन्ह्याबाबत सी.डी.आर , सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे असताना देखील चौकशी न केल्याने खडेबोल सुनावले आहेत.