Pune Crime News | पुण्यात 11 महिन्यात 236 बेवारस मृतदेह; सामाजिक व्यवस्थेचे धिंडवडे

पुणे : Pune Crime News | शहरात बेवारस आणि अनोळखी मृतदेह आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. माणसांनी गजबजलेल्या महानगरात किड्यामुंग्यांसारखी रस्त्यावर, नदीच्या घाटावर, वर्दळीच्या ठिकाणी मृतदेह आढळत आहेत. अनेकजण विविध कारणांनी शहरात वास्तव्यास येतात. अनेकजण मिळेल ते काम करतात तर काहीजण भीक मागून जगतात. (Dead Bodies Found In Pune City)
अनेकांना मानसिकता, विविध आजार यामुळे भीक मागणेही शक्य होत नाही. ऊन, वारा, पावसात मिळेल त्याठिकाणी जगण्याचा प्रयत्त्न हे लोकं करतात. फाटक्या, मळलेल्या कपड्यांमध्ये ते रस्त्याच्या कडेला पडून राहतात. त्यांच्याकडे कोणाचे लक्षही जात नाही. भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन अनेकदा कागदावरच राहाते.
पुणे पोलीस आयुक्तलयांतर्गत २०२४ या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत २३६ बेवारस मृतदेह आढळले आहेत. २०२३ च्या तुलनेत हे प्रमाण अधिकचे आहे. बेवारस मृतदेह ५ दिवस शवागारात ठेवण्यात येतो. दरम्यानच्या काळात नातेवाईकांचा शोध घेतला जातो. नातेवाईक मिळून न आल्यास पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पूर्तता करून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठीचा खर्च संबंधित पोलीस ठाण्यातील पोलिसांना करावा लागतो. खर्च सादर केल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून खर्चाची रक्कम मंजूर केली जाते.
पुणे पोलीस आयुक्तलयांतर्गत आढळलेले बेवारस-अनोळखी मृतदेह :
जानेवारी-३४, फेब्रुवारी-२२, मार्च-०१, एप्रिल-०३, मे-३४, जून-३३, जुलै-४२, ऑगस्ट-५४, सप्टेंबर-३५, आक्टोबर-४०, नोव्हेंबर-३८