Gangapur Crime News | पत्नी नांदण्यास येत नसल्याने नदीत उडी घेत पतीची आत्महत्या; वर्षभरापूर्वी झाला होता विवाह

गंगापूर : Gangapur Crime News | पत्नी नांदायला येत नसल्याने कायगाव येथील गोदानदीपात्रात उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवार (दि.७) उघडकीस आली आहे. सुशील मुकिंदा तायडे ( वय- ३५, रा- देवरी, ता-अकोट, जि-अकोला) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो वाळूज एमआयडीसीमध्ये कामाला होता. (Suicide Case)
सुशीलचा वर्षभरापूर्वी विवाह झालेला होता. तो आपल्या पत्नीसह वाळूज एमआयडीसी येथे राहात होता. मात्र लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच पत्नी माहेरी गेल्याने तो वडगाव कोल्हाटी येथे बहिणीकडे राहात होता, अशी माहिती त्याचे मेहुणे अशोक सरकटे यांनी दिली.
सुशील हा बुधवार (दि.४) पासून बेपत्ता होता. जुने कायगाव येथील नदीपात्रात मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक प्रमोद काळे, अंमलदार अनिरुद्ध शिंदे, दत्तात्रय गुंजाळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केला. पोलिसांनी मृताचा चुलत भाऊ राहुल तायडे यांच्याकडून ओळख पटवली त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.