Swargate Depo-CNG Station | स्वारगेट- निगडी डेपोतही सीएनजी स्टेशन सुरु करण्यासाठी पीएमपी प्रशासन सकारात्मक; बसेसचा अनावश्यक पल्ला वाचणार

पुणे : Swargate Depo-CNG Station | पीएमपीच्या सीएनजी बसेससाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीएमपीच्या सुमारे २०० बसेसला सीएनजी भरण्यासाठी आता दुसऱ्या डेपोवर जाण्याची गरज भासणार नसून स्वारगेट आणि निगडी डेपोत नव्या सीएनजी स्टेशनच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे पीएमपी बसेसचा अनावश्यक पल्ला वाचणार असून त्यामुळे प्रवाशांना बससेवा वेळेत मिळणार आहे.
सध्या पीएमपीच्या १५ आगारांपैकी पाच ठिकाणी (न.ता. वाडी, पिंपरी, कोथरूड, हडपसर आणि कात्रज) सीएनजी सुविधा आहेत. स्वारगेट आणि निगडी डेपोत सीएनजी स्टेशन करण्यात सुरुवात झाली असून उर्वरित ८ डेपोतही अशा सुविधा सुरू करण्याबाबत पीएमपी प्रशासन सकारात्मक आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय होईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे पीएमपीच्या बससेवेत लक्षणीय सुधारणा होईल, खर्चात १ लाखपर्यंत बचत होईल, आणि प्रवाशांचा वेळ वाचेल, असे अपेक्षित आहे.
पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्थेच्या (पेसो) मंजुरीनंतर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) मार्फत स्वारगेट आणि निगडी डेपोत सीएनजीचा पुरवठा सुरू होणार आहे. सध्या मुख्य रस्त्यांपासून डेपोत येणाऱ्या रस्त्यांवर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार आहे. या सुविधांमुळे पीएमपीच्या बसचा अनावश्यक पल्ला थांबेल आणि फेऱ्यांची संख्या वाढून प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
सध्या स्वारगेट डेपोतून ११० बस सीएनजी भरण्यासाठी न.ता. वाडी किंवा कात्रज डेपोत जातात, तर निगडी डेपोतील ९० बस चिखली डेपोत सीएनजी भरण्यासाठी जात असतात. या रिकाम्या फेऱ्यांमुळे पीएमपीला उत्पन्न मिळत नाही, उलट खर्चात वाढ होते. यामुळे बस सेवेत विलंब होतो आणि फेऱ्यांची संख्या कमी होते. मात्र, पुढील दोन महिन्यांत प्रकल्प पूर्ण होऊन नव्या सीएनजी स्टेशनमुळे ही समस्या सुटणार आहे.
“येत्या एक ते दोन महिन्यात स्वारगेट आणि निगडी या दोन्ही डेपोत सीएनजी स्टेशन कार्यान्वित होतील. तसेच प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढेल आणि अधिकाधिक फेऱ्या उपलब्ध होणार आहेत”, अशी माहिती ‘पीएमपी’ व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.