Pune Crime News | पुणे : नाकाबंदीतील महिला पोलिसाला भरधाव कारने उडवले; आरटीओजवळील पहाटेची घटना

पुणे : Pune Crime News | ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेमध्ये नाकाबंदी केली असताना भरधाव जाणार्‍या कारने बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस अंमलदारला धडक देऊन जखमी केले.

दीपमाला राजू नायर असे जखमी झालेल्या महिला पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ही घटना आरटीओजवळील रोडवर (RTO Road Pune) सोमवारी पहाटे दीड वाजता घडली. दारुच्या नशेतील कारचालकांने पळून जाण्यासाठी हा प्रकार केल्याचे समजते. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्या कार चालकाचा शोध सुरु आहे.

आरटीओजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी मिल्स रोडवरुन एक कार वेगाने आली. बंदोबस्तावरील महिला अंमलदाराने या कारला थांबण्याचा इशारा केला. तेव्हा या कार चालकाने थांबल्यासारखे केले़ चालकांची तपासणी करण्यासाठी नायर या पुढे गेल्या असताना कारचालकाने अचानक कार पुढे घेऊन नायर यांना धडक दिली व तो बॅरिकेटला धडक देऊन तेथून पळून गेला. या गाडीचा नंबर मिळाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.