Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर

पिंपरी : Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | सामान्य नागरिकांनी चुकीचे काम केले किंवा कर थकविला की महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, भाडेतत्त्वावरील महापालिकेच्या २२ इमारतीचे भाडे पोलिसांनी थकविल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेचे सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे दिलेले नाही. त्यामुळे शहरात हा चर्चेचा मुद्दा ठरत आहे. (Pimpri Chinchwad Police)
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना १५ ऑगस्ट २०१८ ला करण्यात आली. त्यापूर्वी पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून शहरात पोलिस ठाणी होती. तेव्हा विविध भागात पोलिस ठाण्यासाठी महापालिकेने इमारती आणि जागा भाड्याने दिल्या आहेत.
नवीन आयुक्तालय सुरू झाल्यानंतर चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेची इमारत पोलिस आयुक्तालयासाठी देण्यात आली. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर आणि त्यापूर्वीही जागा भाड्याने दिल्या आहेत.
मुख्यालयासाठी निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत तसेच मोकळी जागाही दिली आहे. थेरगाव पोलिस चौकीसाठी महिला विकास केंद्राची इमारत अशा २२ इमारती महापालिकेने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पोलिस उपायुक्त परिमंडळ तीनच्या कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे.
कार्यालयाचे नाव आणि थकबाकी खालीलप्रमाणे :
*आयुक्तालय इमारत – २ कोटी ६० लाख ५६ हजार
*दिघी ठाणे – १ कोटी ९१ लाख ३५ हजार
*वाहतूक शाखा, चापेकर चौक १ कोटी ३१ लाख ७ हजार
*पोलिस मुख्यालय, निगडी – ६० लाख ४९ हजार
*थेरगाव चौकी – ३५ लाख २३ हजार
*पोलिस उपायुक्त – १८ लाख ५६ हजार
*सांगवी ठाणे – १० लाख ६४ हजार
*गुन्हे युनिट – ३, मोहननगर – ८ लाख ९७ हजार
याबाबत सहायक आयुक्त मुकेश कोळप म्हणाले, ” आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर दिल्या आहेत. या भाड्यापोटी पोलिसांकडे ७ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. याबाबत पोलीस विभागाशी संवाद सुरु आहे.”