Kolhapur Crime News | कप केक विषबाधा प्रकरणातील बालकाचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाहेर काढला

कोल्हापूर : Kolhapur Crime News | कप केकमधून विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या श्रीयांश आंगज (वय-४) याचा मृतदेह बुधवारी उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी दफनभूमीतून बाहेर काढला. यावेळी अन्न व औषध प्रशासन, भेसळ प्रतिबंधक व आरोग्य विभाग यांनी आवश्यक ते नमुने तपासणीसाठी घेतले. पोलिसांच्या पंचनाम्यानंतर श्रीयांशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, श्रीयांशची बहीण काव्या (वय-७) हिची उत्तरीय तपासणी कोल्हापुरातच झाली आहे.
चिमगावमधील रणजित आंगज यांचा मुलगा श्रीयांश व मुलगी काव्या यांना नातेवाइकांनी आणलेल्या केकमधून विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. सोमवारी (दि.२) मुलांना पोटात दुखून उलट्या सुरू झाल्याने प्रथमोपचार करण्यात आले होते, पण त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. मंगळवारी (दि.३) सकाळी श्रीयांशचा मृत्यू झाला. दरम्यान, गंभीर असलेल्या काव्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तिचा उपचार सुरू असताना सायंकाळी मृत्यू झाला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप पावडे, सहायक आयुक्त यू. एस. लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी आर.पी. पाटील यांच्यासह पथकाने ज्या दुकानातून नातेवाईकांनी केक खरेदी केला तेथे तपासणी केली. तसेच आंगज कुटुंबीयांच्या घरी जाऊन खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत.
मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भुमरे व त्यांच्या पथकाने श्रीयांशच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जागेवरच केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कृषी सहायक अधिकारी संगीता शिंदे, तलाठी स्मिता शारबिद्रे, पोलिस पाटील किरण भाट, ग्रामसेवक बी.के. साठे, सरपंच दीपक आंगज व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.