Stations On Swargate To Katraj Metro Route | स्वारगेट-कात्रज मार्गावर 4 मेट्रो स्थानके उभारली जाणार; महापालिकेचा प्रस्ताव

पुणे : Stations On Swargate To Katraj Metro Route | स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रो मार्गावर बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर तीन ऐवजी आता चार मेट्रो स्थानके असणार आहेत.
या स्थानकाचा खर्च महामेट्रो करणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. पुण्यात आता मेट्रो सुरू झाली असून अनेक ठिकाणी स्टेशनचे बांधकाम सुरू आहे तर काही स्टेशनचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.मात्र स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम पुर्ण होऊन अखेर ते आता पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे.
स्वारगेट- कात्रज भूमिगत मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी मेट्रोकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. १०० फूट जमिनीखालून खोदकाम करावे लागणार आहे. त्याकरिता आवश्यक असलेला जिऑलॉजिकल सर्व्हेही मेट्रोकडून करण्यात आला आहे.
स्वारगेट ते कात्रज या सुमारे ५.४०० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये मार्केटयार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गासाठी सुमारे २ हजार ९५४ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पात पुणे महापालिकेचा आर्थिक सहभाग १५ टक्के म्हणजेच ४८५ कोटी असेल. या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिका देणार असून तिची किंमत २४८ कोटी असणार आहे.
मेट्रोच्या दोन स्थानकामधील अंतर हे एक ते दीड किलोमीटर पेक्षा अधिक नसावे, असा नियम आहे. मात्र या विस्तारित मेट्रो मार्गाच्या पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर १.९०० मीटर इतके आहे. त्यामुळे धनकवडी, बालाजीनगर येथील नागरिकांना मेट्रोचा फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे बालाजीनगर येथे मेट्रो स्थानक व्हावे, अशी मागणी राजकीय मंडळी व नागरिकांकडून केली जात होती.
या भागातून स्वारगेटकडे ये- जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून बालाजीनगर येथील मेट्रो स्थानकाचा मोठा फायदा या भागातील नागरिकांना होईल. तसेच मेट्रोला देखील प्रवाशी उपलब्ध होऊन उत्पन्न वाढेल. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्यानंतर प्रशासनाने बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे.