Pune PMC News | आता पारव्यांना खाद्य देणाऱ्यांवर पुणे महापालिका 5 हजारांचा दंड ठोठावणार; घनकचरा विभागाकडून होणार कारवाई

पुणे : शहरात पारव्यांना खाद्य टाकल्यास आता महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. या पारव्यांमुळे श्वसनाचा आजार होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता यापुढे पारव्यांना खाद्यपदार्थ, धान्य टाकणाऱ्यांवर पालिकेककडून दंडात्मक कारवाई होणार आहे. (Pigeon Eating Food Alert)
यासाठी अशा नागरिकांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण केल्याचा ठपका ठेवून घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी ५०० रुपये दंड आकारला जात होता मात्र आता ही दंडात्मक रक्कम ५ हजार रुपये करण्यात आली आहे.
शहरात मागील काही वर्षांपासून पारव्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. या पारव्यांच्या पिसांमुळे आणि विष्ठेतील जंतूमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया या आजाराची लागण नागरिकांना होत आहे. शहरातील चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर, नदीपात्र यांसह अन्य ठिकाणी पारव्यांना खाद्यपदार्थ टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याठिकाणी पोतेच्या पोते धान्य टाकले जात असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारी प्राप्त आहेत. अशाप्रकारे पारव्यांना खाद्य टाकू नये अथवा कारवाई करण्यात येईल असे बॅनर लावण्यात आले. मात्र ही कारवाई पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग की घनकचरा विभाग करणार याबाबत स्पष्टता नव्हती.
आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) म्हणाले, ” पारव्यांमुळे नागरिकांना आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना खाद्य म्हणून धान्य किंवा खाद्य पदार्थ देणाऱ्यांवर अस्वच्छता निर्माण केल्याबाबत कारवाई केली जाईल. ही दंडात्मक कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केली जाईल.