Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण; फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये

kidnapping
5th December 2024

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीचा धक्का लागल्याने तरुणाला मारहाण करुन त्याचे अपहरण (Kidnapping Case) करुन त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. शिवाय फोन पे (PhonePe) द्वारे १० हजार रुपये घेणाºया तिघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल केला आहे.

याबाबत विशाल शाहुराज दुधभाते (वय २५, रा. व्हिल प्लाझा सोसायटी, भेकराईनगर, हडपसर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनोद दिलीप सोनावणे Vinod Dilip Sonawane (वय ३३, रा. गणराज कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार नितीन गारडे (रा. भोसरी) आणि सोन्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरीतील आळंदी रोडवरील एस पी जी शाळेसमोर सोमवारी सायंकाळी ६ ते मध्यरात्री बाराच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एस पी जी शाळेसमोर फिर्यादीच्या गाडीचा धक्का आरोपींना लागला. या कारणावरुन फिर्यादी व त्यांचे नातेवाईक शिवाजी लक्ष्मण काळे यांना आम्हाला नुकसान भरपाईचे पैसे दे नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. दोघांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच स्विफ्ट डियायर या कारमध्ये दोघांना जबरदस्तीने बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना मोशी, चाकण परिसरात नेऊन त्यांच्या खिशातून ३०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच फिर्यादीचे मोबाईलमधील फोन पे द्वारे १० हजार रुपये स्कॅनवर स्कॅन करुन जबरदस्तीने काढून घेतले. पोलिसांनी एकाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.