Bhima Koregaon Shaurya Din | भीमाकोरेगाव शौर्यदिन सोहळ्यासाठी 25 लाख लोक सहभागी होणार; विजयस्तंभ स्मारकासाठी आंबेडकरी अनुयायी आग्रही

Bhima Koregaon Shaurya Din

पुणे : Bhima Koregaon Shaurya Din | १ जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यासाठी सुमारे 25 लाख भीम अनुयायी सहभागी होणार असून त्या दृष्टीने सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न पुणे जिल्हा प्रशासन व समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे समन्वय अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी शासनाने घोषित केलेले भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक लवकर व्हावी यासाठी आंबेडकरी जनता आग्रही असल्याचे प्रतिपादन मा.उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी यावेळी केले.

दोन दिवस अभिवादन कार्यक्रम

महार शौर्यदिन सोहळ्यासाठी तब्बल 25 लाख भीम अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरून यावर्षी देखील गर्दीचे नियोजन तसेच सर्वांनाच अभिवादन करता यावे म्हणून ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच कुटुंबीयांच्या मागणीनुसार दिनांक 31 डिसेंबर एक जानेवारी असा दोन दिवस अभिवादन कार्यक्रम सुरू राहणार आहे.

अनुयायांना पिण्याचे पाणी , पार्किंग , अभिवादन रांग , आराम कक्ष , शौचालय व इतर सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती समवेत सातत्याने बैठका करण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी , नागरिक तसेच समाज माध्यमांद्वारे प्राप्त सूचनांचा अंतर्भाव करून अचुक नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासकीय समिती व समन्वय समिती करत आहे.

दरवर्षी अभिवादन सोहळ्यासाठी शासनाच्या वतीने उपस्थित राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह यंदाच्या वर्षी नव्याने पदभार स्वीकारणारे मुख्यमंत्री यांनी देखील अभिवादनासाठी यावे यासाठी समन्वय समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. ना. अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री , आमदार तसेच काही खासदार हे अभिवादनासाठी येणार आहेत.

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री मा. रामदासजी आठवले , वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर , पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे ,भीम आर्मी पक्षाचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद , काँग्रेस पक्षाचे खासदार चंद्रकांत हंडोरे , रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर या अभिवादन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

अभिवादन सोहळा परिसरामध्ये दिनांक 1 जानेवारी रोजी विविध राजकीय पक्षांच्या सुमारे 11 सभा व संमेलने आयोजित करण्यात आले असून अनेक आंबेडकरी कलावंत गायक व शाहीर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.

मागील वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील आंबेडकरी साहित्य विक्रेत्यांना समाज कल्याण विभागाच्या वतीने सुमारे 600 पेक्षा अधिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पुस्तकांचे महाप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

भीमाकोरेगाव येथील नियोजित राष्ट्रीय स्मारकाचे काम पुढे गेले नसल्याने आंबेडकरी जनतेमध्ये याबाबत प्रचंड नाराजी असून अन्य स्मारकांचे कामकाज पुढे जात असताना भीमा कोरेगाव स्मारकाकडे मात्र जाणीव दुर्लक्ष केले जात आहे ही बाब निषेधार्य आहे. दरम्यान यावर्षी स्मारकाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी व यास्मारकास गती प्राप्त व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष प्राधिकरण स्थापन करण्यात यावे अशी मागणी समितीच्या वतीने यापूर्वीच राज्य सरकारकडे करण्यात आलेली असून त्याच्या पूर्ततेसाठी देखील पाठपुरावा करण्यात येणार आहे. अशी माहीती समन्य समितीचे सल्लागार डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिली.

भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिरमेंट मधून विविध पदांवरील निवृत्त झालेल्या सुमारे तीन हजार महार सैनिकांकडून मानवंदना देण्यात येणार आहे. बॅड पथक असलेल्या रॅली द्वारे विजयस्तंभाला मानवंदना देऊन या ठिकाणी महार रेजिमेंटचे अधिकृत असलेले ” महार गाण ” सामुहीक गायले जाणार आहे.

भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सुमारे एक लाख अनुयायांना भोजनाची व अल्प उपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे.