Sunil Shelke MLA | सुनील शेळकेंच्या वक्तव्याने उत्सुकता वाढली; म्हणाले – ‘मला मंत्री करण्याची अजित दादांची इच्छा’

पुणे : Sunil Shelke MLA | मावळ पॅटर्नचे चक्रव्यूह भेदून विक्रमी मतांनी विजयी होणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याने अनेकांची उत्सुकता वाढली आहे. एकीकडे सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे तर दुसरीकडे मंत्रिपदासाठी वर्णी लागावी म्हणून नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच ” मला मंत्री करण्याची इच्छा अजितदादांचीही आहे, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केले आहे. (Mahayuti Govt)

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्री पदाच्या यादीत मावळच्या सुनील शेळकेंचे नाव आहे. भाजप, शरद पवार गट, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, मनसे यांसह विविध संघटनांच्या मावळ पॅटर्नवर शेळके भारी पडलेत. शेळके १ लाख ८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्याने अजित पवार त्यांना मंत्री पदाचे बक्षीस देतील, असा त्यांना विश्वास आहे.

माध्यमांशी बोलताना सुनील शेळके म्हणाले, ” माध्यमांमध्ये मला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या पाहिल्या. परंतु मी अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्यांकडे माझी व्यक्तिगत इच्छा व्यक्त केलेली नाही. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आहेत. या पक्षातील प्रमुख नेत्यांना पहिले मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले जाईल.

त्यानंतर नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आहे अशा पद्धतीची काही माहिती मला मिळाली आहे. मात्र, उद्याच्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी मिळाली तर माझ्या पक्ष संघटनेकरता तालुक्याच्या विकासाकरिता अधिकच योगदान किंवा अधिक काम करण्याची माझी तयारी असणार आहे”, असे शेळके यांनी म्हंटले आहे.