FIR On Indu Infotech | मतमोजणीची रंगीत तालीम करता आली नाही ! इंदु इन्फोटेक कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

FIR

पुणे : FIR On Indu Infotech | विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी (Maharashtra Assembly Election Counting) लागणारे संगणक व त्याच्या जोडणीचे काम वेळेत पूर्ण न करता आल्याने मतमोजणीची रंगीत तालीम करता आली नव्हती. यामुळे पोलिसांनी इंदु इन्फोटेक कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मंडल अधिकारी पुष्पा वसंत गोसावी यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची पुणे शहरातील ८ मतदार संघातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम यांच्या गोदामात करण्यात आली होती. मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये इंदु इन्फोटेक या कंपनीस संगणक पुरवठा व जोडणीचे काम कराराने देण्यात आले होते. मतमोजणी २३ नोव्हेबर रोजी होती. त्या अगोदर आदल्या दिवशी मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात येणार होती. त्यासाठी हे काम त्यांनी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ते वेळेत पूर्ण केले नाही. त्यामुळे २२ नोव्हेबर रोजी मतमोजणीची पूर्व रंगीत तालीम घेता आली नाही.

इंदु इन्फोटेक कंपनीला हे काम वेळेत पूर्ण करता न आल्याने शेवटी प्रशासनाला हे काम इतरांकडून पूर्ण करुन घ्यावे लागले होते. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे लोकप्रतिनिधी व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार इंदु इन्फोटेक कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर अधिक तपास करीत आहेत.