Eknath Shinde-Mahayuti Govt | महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असतील का? शिवसेना नेत्याचे मोठे वक्तव्य; म्हणाले – “रात्री उशिरा बैठक…”

मुंबई : Eknath Shinde-Mahayuti Govt | विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३० जागा जिंकत मोठे यश मिळवले. मात्र विधानसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये खरा गोंधळ बघायला मिळाला. गेल्या दहा दिवसात महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. पण, मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण आणि कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार?, याबद्दलचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या ट्विटनंतर राज्यात राजकीय गोंधळ अधिक वाढला आहे. त्यामुळे मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? सरकारमध्ये असणार का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आता या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट (Sanjay Sirsat) यांनी भाष्य केले आहे.
महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे असतील का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ” याबद्दल आज (३ डिसेंबर) सायंकाळी कळेल. रात्री उशिरा बैठक होईल. दुपारी मुख्यमंत्र्यांचीही सह्याद्री अतिथीगृहावर वेगळ्या विषयावर बैठक आहे”, असे शिरसाट यांनी म्हंटले आहे.
सत्तास्थापन, विरोधी पक्ष नेत्याबाबत भाजपची नवी खेळी काय आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकाही पुन्हा बदलताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काळात राजकीय पटलावर मोठी उलथापालथ होऊ शकते असे बोलले जात आहे.