Uddhav Thackeray On Eknath Shinde | सत्तास्थापनेवरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका; म्हणाले – ‘राक्षसी बहुमत मिळाल्यावरही राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जावं लागतंय’

पुणे : Uddhav Thackeray On Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्याचा (EVM Scam) संशय व्यक्त करीत जेष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे ९५ व्या वर्षी आत्मक्लेष उपोषण सुरु आहे. दरम्यान आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. “मला असं वाटतंय की आम्ही करतोय ते बरोबर करतोय हे सांगणारं कोणीतरी वडिलधारं असावं लागतं. ते काम तुम्ही केलंय. पण आता तुम्ही आत्मक्लेश करू नका. हा आत्मक्लेश अख्ख्या महाराष्ट्राचा आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बाबा आढाव यांचे उपोषण सोडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीवर निशाणा साधला आहे.

“राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही? सगळ्यांचे चेहरे पडले का आहेत? राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? त्यांनी राजभवनात जायला पाहिजे”, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, ” राजभवनात आम्हीही गेलो होतो. आम्ही एकमेकांविरोधात लढलेली माणसं होतो. पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागली होती. आता विधानसभेची मुदत संपलेली असताना राष्ट्रपती राजवट का लागली नाही. या सर्व प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही.

एवढं बहुमत मिळाल्यावर सुद्धा लोक राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जातात? अमावस्येचा मुहूर्त का घेतात? मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळात कोण येणार? याबाबत कोणतीही माहिती नाही”, असे ठाकरे यांनी म्हंटले आहे.