Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘… हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’

Sharad Pawar-Baba Adhav

पुणे : Sharad Pawar News | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election Results 2024) महायुतीने (Mahayuti) २३० जागा मिळवत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये भाजपने (BJP) सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या, शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shivsena Shinde Group) ५७ तर राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar NCP) यांनी ४१ जागा जिंकल्या. २६ नोव्हेंबरला राज्याच्या विधानसभेचा कालावधी संपला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल अशी चर्चा होती मात्र तसे काही झालेले नाही. राज्यातील सत्ता स्थापनेला उशीर का होतोय? असा प्रश्न जनतेला पडला आहे. दरम्यान यावरूनच शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

” इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही. आजच वाचलं आता ५ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ लोकांचे बहुमत याला काही महत्त्व नाही. जे काही चाललंय ते राज्यासाठी अशोभनीय आहे”, असं सांगत शरद पवारांनी टीका केली आहे.

बाबा आढाव (Baba Adhav) यांच्या आंदोलनस्थळी शरद पवारांनी भेट दिली, गेल्या तीन दिवसांपासून ईव्हीएम (EVM) विरोधात बाबा आढाव आंदोलनाला बसले आहेत. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईव्हीएम वर बोलताना ते म्हणाले, ” सत्तेचा गैरवापर आणि बड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी दिसतात. माझ्याकडे आता पुरावा नाही, काही लोकांनी निदर्शनास आणून दिले आहे. काहींनी प्रेझेंटेशन दाखवले, आम्ही त्यांच्यावर फार विश्वास ठेवला नाही कारण आम्हाला वाटत होते, निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल वाटले नाही.

निवडणूक आयोगावर आम्ही संशय व्यक्त केला नाही. परंतु निवडणुकीनंतर यात तथ्य आहे हे दिसून येते. फेर मतमोजणीत काही समोर येईल वाटत नाही. मतदानाच्या शेवटच्या २ तासांमधील जी आकडेवारी समोर येत आहे ती धक्कादायक आहे.

बाळासाहेब थोरातांसह अनेकांनी अशी माहिती समोर आणली आहे. त्याचा विचार करावा लागेल. इंडिया आघाडीने एकत्रितपणे हा विषय चर्चेत घ्यावा अशी चर्चा आहे. सोमवारी किंवा मंगळवारी याबाबत निर्णय होईल”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.