Nana Patole News | ‘निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला’, नाना पटोलेंचा घणाघात; म्हणाले – ‘भाजप अन् निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली’

मुंबई : Nana Patole News | विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. दरम्यान विरोधकांकडून ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Assembly Election Results 2024)
“काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल”, असे पटोले यांनी म्हंटले आहे.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, ” महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून, मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे”, असा घणाघात पटोलेंनी केला आहे.
ते पुढे म्हणाले,” राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते, यावेळी आयागाने पत्रकार परिषद का घेतली नाही.
वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे”, असे पटोले यांनी म्हंटले आहे.