Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांच्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ; म्हणाले – ‘भाजपचा नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर’

Chandrakant-Patil-9 (1)

पुणे : Chandrakant Patil | विधानसभा निवडणुकांचे निकाल (Maharashtra Assembly Election Results 2024) जाहीर होऊन पाच दिवस झाले असले तरी महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) अद्याप स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून भाजपच्या निर्णय प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबाबत चर्चा आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर बोलताना भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजप नेहमीच नवीन नेतृत्व शोधण्यावर भर देतो आणि त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवते. राजस्थान आणि मध्यप्रदेश सारख्या राज्यांमध्ये भाजपने नवीन प्रयोग राबवले. मात्र, महाराष्ट्रात असे प्रयोग होणार का, याबाबत मी काही सांगू शकत नाही.

पक्षाची केंद्रीय समिती असून त्यात विविध विषय चर्चा होऊन वेगवेगळ्या जबाबदारीचे वाटप करण्यात येईल. आमचे नेते कोणाला मंत्रीपद द्यायचे याबाबत निर्णय घेतील. पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडतो”, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का?, की भाजप एखादा नवीन चेहरा पुढे करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.