Pune Police News | अंमली पदार्थ शोधण्यात महत्वाची भूमिका निभावणारा श्वान लिओ याचे निधन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : Pune Police News | पुणे शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थ शोधण्यात गेली ८ वर्षे शहर पोलीस दलात मोलाची भूमिका पार पाडणारा श्वान लिओ याचे आज निधन झाले. लिओ याला अन्न नलिकेचा आजार झाला होता. त्यातच त्याचे निधन झाले. शासकीय इतमामात त्याच्यावर महापालिकेच्या विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे तसेच एम ओ बीचे पोलीस निरीक्षक, श्वान पथक पोलीस उपनिरीक्षक, श्वान पथक पोलीस अंमलदार सलामी गार्ड उपस्थित होते.
श्वान लिओ याचा जन्म २० जुलै २०१६ रोजी झाला असून त्याचा २० सप्टेंबर २०१६ रोजी शहर पोलीस दलात प्रवेश झाला. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नायजेरियन नागरिकाकडून २८ डिसेबर २०१९ रोजी त्याने ५० किलो गांजा व एम डी सापडून दिले होते. लोणी काळभोर येथील शेतामधून ७० किलो गांजा जप्त करण्यात त्याचा सहभाग होता.
विविध रेल्वे स्टेशन, बस स्टँड, येरवडा कारागृह येथे नियमित तपासणी करुन अंमली पदार्थांचा शोध घेऊन त्याची माहिती तो देत असे. तसेच इंडियन आर्मी जवानांकरीता डेमो प्रात्याक्षिके, विविध शाळांमध्ये प्रात्याक्षिके सादर करण्यात लिओ याचा सहभाग असे. लिओ याला अन्ननलिकेचा आजार असल्याचे नुकतेच निदान झाले होते. यातच त्याचे मंगळवारी निधन झाले.