Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

पुणे : Ulhas Dhole Patil | पुणे महापालिकेत नाना या नावाने प्रसिद्ध असलेले माजी महापौर उल्हास बाळकृष्ण ढोले पाटील यांचे सोमवारी निधन झाले़ गेल. काही दिवस ते आजारी होते. सोमवारी सकाळी यांची प्राणज्योत मालवली.

उल्हास ढोले पाटील हे एक सुप्रसिद्ध व्यापारी कुटुंब आहे. काही दशकांपूर्वी उल्हास ढोले पाटील आणि त्यांची पत्नी कमल ढोले पाटील यांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. आपल्या व्यवसायातून समाजाला परत करण्याच्या इच्छेतून मित्राच्या आग्रहावरुन उल्हास ढोले पाटील यांनी १९७४ मध्ये अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणुक लढविली. ते निवडूनही आले. तेव्हापासून अनेक वर्षे ते महापालिकेचे सदस्य होते. सलग सहा वेळा वेगवेगळ्या सहा चिन्हांवर ते महापालिकेत निवडून येत होते. ते सलग ३८वर्षे नगरसेवक होते.

परिवहन सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८६ मध्ये त्यांची महापौर म्हणून निवड झाली होती. राजकारण, समाजकारण करत असले तरी घरोघरी दुधाचा रतीब घालण्याचे काम त्यांनी सोडले नाही. दुध घालणारा महापौर म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पत्नी कमल ढोले पाटील याही नगरसेविका होत्या. दोघेही नाना नानी म्हणून लोकप्रिय होते. कमल ढोले पाटील या आमदारही झाल्या. उल्हास ढोले पाटील यांना राहुल व सागर ढोले पाटील अशी दोन मुले आहेत. शेती, दुग्ध, हॉटेल व्यवसायाबरोबरच ढोले पाटील परिवार शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे.