Kedar Dighe News | “पुन्हा निवडणूक घ्या, कारण…”, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी

मुंबई : Kedar Dighe News राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा कल समोर आला आहे. तर मविआ ची मोठी पिछेहाट दिसून येत आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध केदार दिघे अशी लढत होती. प्रचाराच्या दरम्यान आनंद दिघे यांचा वारसा दोन्ही नेत्यांनीही सांगितला होता. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, केदार दिघे यांनी निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
केदार दिघे म्हणाले, “आम्ही दोन आक्षेप नोंदवले होते, बॅलेट किंवा पोस्टल पद्धतीने जे मतदान झालं ती पाकिटं मोकळीच होती. त्यामुळे तिथे काही तडजोड झाली आहे का? हा प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे ईव्हीएम सुरु केल्यानंतर ९९ टक्के बॅटरी होती. लोकांनी मतदान केल्यानंतर बॅटरी ९९ टक्केच होती. जर मतदान झालं तर बॅटरी खर्च व्हायला हवी. पण तसं झालेलं नाही.
त्यामुळे त्यातही काहीतरी घोळ आहे असं दिसतं आहे. त्यामुळे आमची ही मागणी आहे की निवडणूक परत घेतली जावी. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आक्षेप घेतला जातो आहे. न्याय मिळाला पाहिजे मात्र या सरकारकडून अपेक्षा नाही. सिस्टिममध्ये कॉम्प्रोमाइज झालं आहे. निवडणूक पुन्हा घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे”, असे केदार दिघे यांनी म्हंटले आहे.