Chandan Nagar Pune Crime News | पतीपत्नीच्या भांडणात दुचाकीवरुन पडून मुलगी जखमी; विभक्त कुटुंबातील भांडणातून मुलीचे हाल

पुणे : Chandan Nagar Pune Crime News | पतीपत्नी हे घटस्फोट घेत असून ते विभक्त राहतात. अशा वेळी त्यांच्या मुलांचे मात्र हाल होतात, असे म्हटले जाते. इथे मात्र आईवडिलांच्या भांडणात मुलीचे खरोखरच हाल झाले आहेत. दुचाकीवरुन जाणार्‍या पत्नीकडून मुलीला ओढल्याने १० वर्षाची मुलगी खाली पडून जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती निखील जुड पिकार्डो (वय ४६, रा. जलवायु विहार, खारघर,नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खराडी येथील गेराज ग्रीन्जविल स्कायविलास सोसायटी येथे १५ नोव्हेबर रोजी घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी असून ते सध्या विभक्त राहत आहेत. त्यांना १० वर्षाची मुलगी असून ती आपल्या आईकडे फिर्यादीकडे आहे. त्यांच्यात घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरु आहेत. न्यायालयाने तिचे वडिलांनी कधी व कोठे भेटावे याबाबत आदेश दिला आहे. तसेच आरोपीने काय करावे व काय करु नये, याबाबतही न्यायालयाने सांगितले आहे. त्या आदेशाचा आरोपी पतीने भंग केला.

फिर्यादी या आपले स्कुटी वरुन मुलीला पाठीमागे बसवून खराडी येथील घरी जात होत्या. त्यावेळी सोसायटीच्या आवारात पतीने मुलीला गाडीवरुन ओढल्यामुळे फिर्यादी व त्यांची मुलगी खाली पडल्या. त्यात दोघी जखमी झाल्या आहेत. पतीने त्यांना बघुन घेण्याची धमकी दिली आहे. सहायक फौजदार सोनवणे तपास करीत आहेत.