Sanjay Raut On MH Assembly Election Results | निकाल जाहीर होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले – ‘आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…’

Sanjay Raut

मुंबई : Sanjay Raut On MH Assembly Election Results | विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.२३) जाहीर होणार आहे. सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात याची उत्सुकता जनतेला आहे. एक्झिट पोल्सनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) या एक्झिट पोल्सवर विश्वास नसल्याचे म्हटलं आहे. तसंच, राज्यात महाविकास आघाडीच्या १६० जागा निवडून येतील, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena UBT Leader) संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले, ” लोकसभेला मविआला १० जागाही मिळणार नाही, असं म्हटलं जात होतं, पण आम्हाला ३१ जागा मिळाल्या. सर्वेची ऐशी की तैशी. आम्ही काल एकत्र बसलो. महाराष्ट्रातील मतदान आणि मतदारांचा कौल यासंदर्भात जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. १६० जागा आम्ही सहज जिंकतोय.

हे सर्वे कोणी आणि कसे केले. कसले हे एक्झिट पोल. आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही. सरकार अधिक मजबूत करायचं असेल तिथे लहान पक्ष आणि अपक्ष येतात. पण आमच्याबरोबर शेतकरी कामगार वर्गाचे नेते, समाजवादी, डावे पक्षाचे आमदार येतील. अपक्ष उमेदवारांनीही पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे”, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, ” भाजपाचा हा डाव आहे. त्यांनी आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला आहे. उद्या निकाल लागेल. २४-२५ तारखेला आमदार मुंबईत पोहोचतील, तिन्ही विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील. विधिमंडळ पक्षाचे नेते ठरवले जातील. सत्तास्थापनेचा दावा केला जाईल.

राज्यात राजभवनाच्या शाखा आहेत. कारभार भाजपाचा असल्याने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी ते अडथळे आणतील. आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून. सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.