Prakash Ambedkar News | विधानसभेचा निकाल जाहीर होण्याआधीच प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय; म्हणाले, ” महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी….”

Prakash-Ambedkar-1

मुंबई : Prakash Ambedkar News | यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) मागील तीस वर्षांत पहिल्यांदा ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. राजकीय जाणकारांच्या मतानुसार मताधिक्याचा टक्का वाढला की त्याचा फायदा विरोधी बाकावरील पक्षांना होत असतो. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीनेही (Mahavikas Aghadi) सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनुसार, युती किंवा आघाडीला अपक्ष किंवा लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांची जुळवाजुळवही करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi-VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’वर याबाबत एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.”

तसंच, ‘आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू !”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

राज्यात १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांचा निकाल उद्या (२३ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजल्यापासून जाहीर होईल. पूर्ण निकाल हाती आल्यानंतरच सत्तास्थापनेसाठी राज्यातील राजकीय गणिताचं चित्र स्पष्ट होणार आहे.