Attack On Nitesh Karale | राजकीय वातावरण तापलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नितेश कराळे मास्तरांना मारहाण (Video)

Nitesh Karale

वर्धा : Attack On Nitesh Karale | आज राज्यातील विविध मतदारसंघात मतदान पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती कराळे यांना मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कराळे यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना नितेश कराळे म्हणाले, “मी माझ्या गावावरून मतदान करून येत होतो. तेव्हा वर्धा मतदारसंघात मी निघालो होतो, यावेळी माझ्याबरोबर माझे कुटुंबही होते. उमरी या गावात जाण्या-येण्याचा रस्ता आहे. त्याठिकाणी मी थांबलो लोकांना विचारपूस केली. यावेळी पोलिसांनी सांगितलं की तुमच्या बुथवर दोन लोक ठेवा.

तसेच समोर आमदार पंकज भोयर यांचा बूथ होता. या बूथवर आठ लोक बसून होते. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी देखील बसून होते. एवढंच नाही तर ते कर्मचारी लॅपटॉप घेऊन बसून होते. त्यासाठी पोलिसांना फोन केला आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला विचारण्यासाठी पुढे गेलो असता भाजपाचा उमरी मधील एक कार्यकर्ता माझ्या अंगावर धावून आला आणि मारहाण करू लागला. माझ्या पत्नीलाही शिवीगाळ केली. यामध्ये माझ्या लहान मुलीलाही लागलं”, असा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे.