Vishrantwadi Pune Crime News | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला

Attack on Chandrakant Tingre

पुणे : Vishrantwadi Pune Crime News | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे (Rekha Tingre) यांचे पती चंद्रकांत टिंगरे (Chandrakant Tingre) यांच्यावर चौघा जणांनी दगडफेक करुन जबर जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका (Dhanori Jakat Naka) येथील एमएसईबी कार्यालयसमोर घडली. चंद्रकांत टिंगरे यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर जवळच्या विमल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत टिंगरे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांना पाठिंबा दिला होता. ते आणि त्यांचा कारचालक सचिन गायकवाड हे दुपारी एमएसईबी कार्यालयाकडे गेले होते. तेथे गाडी उभी करुन टिंगरे हे कारमधून खाली उतरले. तेव्हा दुचाकीवरुन तीन ते चार जण आले. त्यांनी तोंडाला फडके बांधले होते. त्यांनी वीटा आणि सिमेंटचे गट्टु टिंगरे यांच्या दिशेने फेकून मारले. त्यातील एक टिंगरे यांच्या डोक्याला लागला आणि ते रक्तबंबाळ झाले. त्यांचा चालक तातडीने बाहेर आला. तेव्हा त्यांनी चंद्रकांत टिंगरे हे जखमी झाल्याचे पाहिले. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत कारची मागची काच फुटली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS), पोलीस उपायुक्त हिंमत जाधव (Himmat Jadhav DCP) व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.