Hitendra Thakur On Vindo Tawade | विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा ! विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप; “तावडेंनी 25 वेळा फोन केला, माफीही मागितली”, हितेंद्र ठाकूर यांचा दावा

Hitendra Thakur - Vindo Tawade

मुंबई : Hitendra Thakur On Vindo Tawade | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार थांबला आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशातच आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी विरारमधील (Vinod Tawade Distributing Money In Virar) एका हॉटेलात पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi-BVA) पक्षाने केला आहे.

विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलकडे धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्य राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर विनोद तावडे गेल्या अडीच तासांपासून हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी ठिय्या देत तावडेंची वाट रोखून धरली आहे. या घटनेनंतर पोलीस आता काय कारवाई करतात? याबाबत उत्सुकता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ” विनोद तावडे हे आज मंगळवार (दि.१९) विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. याठिकाणी पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर त्याठिकाणी झालेल्या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरु होती. पण मतदानापूर्वी ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला माहिती नाही का, एवढी अक्कल तावडेंना नाही का? आता पोलीस या प्रकरणात काय करणार, हे बघायचं आहे. सरकार त्यांचंच आहे, त्यामुळे पुढे काही होणार नाही.”

” या घटनेनंतर विनोद तावडे यांनी मला २५ वेळा फोन करुन माफी मागितली. प्रकरण जास्त ताणू नका”, असे तावडेंनी सांगितल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.