Sharad Pawar News | या गद्दारांचं करायचं काय? भाषण सुरू असतानाच शरद पवारांना चिठ्ठी; पवार म्हणाले – “गद्दारांना पाडा, पाडा पाडा”

सातारा : Sharad Pawar News | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी त्यांना सोडून गेलेल्या सहकाऱ्यांबद्दल कडक भूमिका घेतल्याचं दिसतंय. वळसे पाटलांना गद्दार म्हणून त्यांना पाडण्याचं आवाहन केल्यानंतर आता इतर ठिकाणीही तशीच भूमिका घेतली जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
वाईमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील आणि शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. दरम्यान शरद पवार यांनी वाई- खंडाळा महाबळेश्वर विधानसभेत अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ आज (दि.१६) जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले, ” बऱ्याच दिवसातून तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. मी राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलो. नागपूरपासून दौऱ्याची सुरुवात केल्यानंतर वर्धा, अकोला, यवतमाळ, जालना, बुलढाणा, बीड कोल्हापूर, सांगली करुन आज इथे तुमच्यासमोर आहे. मी जाईल तिथे ऐकायला मिळतयं आज सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकड़ून महाराष्ट्राचे प्रश्न सुटू शकत नाहीत.”
लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार वाईमध्ये गेले होते. आमदार मकरंद पाटील यांच्या कुटुंबातील लग्नासाठी ते उपस्थित राहिले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले, ” मी मकरंद पाटील यांच्या घरातील लग्नात गेलो. सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. मी उशीरा आलो. त्यावेळी मोठमोठ्या टाळ्या आणि घोषणा होत होत्या. त्याचवेळी मला वाईतील लोकांची भावना समजली होती. आताच्या सभेला बसायला जागा नाही. लोक म्हणतात आमचं ठरलंय.”
दरम्यान सभेत बोलत असतानाच शरद पवार यांना एक चिठ्ठी आली. गद्दारांचे काय? असा सवाल या चिठ्ठीमध्ये विचारला होता. त्यावर शरद पवार यांनीही जाहीर सभेत ती चिठ्ठी वाचून दाखवली अन् ज्यांनी गद्दारी केली त्यांना पाडा, पाडा, पाडा असे थेट आव्हानच वाई मतदार संघातील जनतेला केले.