Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना दम दिला? शरद पवारांकडून मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली की…”

पुणे : Sharad Pawar On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान शरद पवारांनी शिरूर येथील सभेत अजित पवार यांची मिमिक्री करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“साखर कारखान्यांसाठी निधी मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटलो होतो. मात्र, पैशांची अडचण आहे, मला समजून घ्या, असं एकनाथ शिंदे मला म्हणाले’, असं भाष्य शरद पवार यांनी केले आहे.
काही महिन्यांपूर्वी शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले होते. त्या भेटीआधी साखर कारखान्यांबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार देखील केला होता. त्याच भेटीबाबत शरद पवारांनी नुकताच खुलासा केला आहे.
शरद पवार म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांना कोणीतरी दम दिला असावा, असं मला जाणवत होतं. कोणीतरी त्यांना पैसे मंजूर करायचे नाहीत, असं म्हटलं असावं.” यावेळी शरद पवारांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे दिसत होता. कारण शरद पवारांनी यावेळी अजित पवारांची मिमिक्री देखील केली.
शरद पवार पुढे म्हणाले, ” साखर कारखान्यांना निधी मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, माझी फार अडचण आहे, मला समजून घ्या. त्यावर मी त्यांना विचारलं काय समजून घेऊ? पैसे असताना तुम्ही देत का नाही? मी तुम्हाला कसं समजून घेऊ? त्यावर त्यांनी मला पैसे देता देणं शक्य नाही, असं सांगितलं.
त्यांच्या बोलण्यावरून मला जाणवलं की यांना कोणीतरी दम दिलेला दिसतोय. हा दम देणारा कोण आहे माहिती आहे का? ‘हे पैसे मंजूर करायचे नाहीत’, ‘काहीही द्यायचं नाही’ असं त्यांना कोणीतरी सांगितलं असावं. बिचारा आमचा एकनाथ, त्याला काय झालं कुणास ठाऊक, त्यांनी मला पैसे देता येणार नाहीत म्हणून सांगितलं. वर मला समजून घ्या अशी विनंती केली”, असे शरद पवार यांनी म्हंटले.