Sharad Pawar News | शरद पवारांचे भाषण सुरू असताना पुन्हा पाऊस; म्हणाले – ‘निवडणुकीचा निकाल चांगला लागणार’

Tutari-Symbol

कोल्हापूर : Sharad Pawar News | शरद पवार यांची इचलकरंजी मध्ये आज (दि.१५) जाहीर सभा झाली. मात्र या सभेवेळी पाऊस सुरू झाला तेव्हा महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. माझा, जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही. परंतु पावसाच्या सभेत मी बोलल्यामुळे निकाल चांगला लागेल”, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. (Maharashtra Assembly Election 2024)

शरद पवार म्हणाले, ” महाराष्ट्रात मी सभेला बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते. त्यात मी बोलल्यानंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो. मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे.

ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा ५ वर्षाचा अनुभव बघितला तर सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सत्तेत बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करून सरकार बनवण्याचं ऐतिहासिक काम उद्याच्या २० तारखेला तुम्हाला करायचे आहे. भरपावसात तुम्ही याठिकाणी आलात, आमची भूमिका समजून घेण्याची तयारी केली त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो”, असे शरद पवार यांनी म्हंटले.

शरद पवार यांचा पावसात भिजताना भाषण देतानाचा फोटो आजही अनेकांच्या लक्षात आहे. साताऱ्यातील त्या सभेचं सर्वत्र कौतुक झाले. पायाला दुखापत होऊनही पवारांनी दाखवलेल्या जिद्दीचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आले. सोशल मीडियात शरद पवारांचा फोटो ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला.

तसेच काहीसे इचलकरंजी येथे घडल्याचे पाहायला मिळाले. सभास्थळी पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यावेळी शरद पवार भाषणाला उभे राहिले. त्यांनी पाऊस आणि भाषण यांच्या योगायोगावरून विनोदी शैलीत यावेळी भाष्य केले.