Maharashtra Assembly Election 2024 | भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाची चर्चा; निकालानंतरच्या राजकीय समीकरणाकडे राज्याचे लक्ष

Vinod Tawade-Pankaja Munde

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीं २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती (Mahayuti) असो किंवा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असो मुख्यमंत्रीपदावरून दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. यातच आता भाजपाचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर विनोद तावडे (Vinod Tawade), पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या नावाची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आली तर मुख्यमंत्री कोण असा सवाल सध्या चर्चेत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) नाही तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नावे चर्चेत आहेत.

भाजपा नेते विनोद तावडे यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे केवळ देवेंद्र फडणवीसच नाही तर अन्य काही चेहरे देखील आहेत असे म्हटले होते. यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाहीत, असे म्हटले आहे.

मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांची नावे चर्चेत आहेत. दोघेही शहरी नेते असले तरी महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. विनोद तावडेंना संधी मिळाली तर त्यांना विधानसभा वा विधान परिषदेतून आमदार व्हावे लागणार आहे.

वंजारी/बहुजन आणि महिला म्हणून पंकजा मुंडे यांचेही नाव घेतले जात आहे. लोकसभा निवडणुकीत त्या कमी मतांनी पराभूत झाल्या पण आज पक्षात सक्रिय आहेत. विधान परिषदेच्या सदस्य आहेत. राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे ओबीसी आहेत आणि ओबीसी चेहरा द्यायचा असे ठरले तर त्यांच्या नावावरही गांभीर्याने विचार होऊ शकतो असे म्हटले जाते.

वेगवेगळ्या निकषांवर वेगवेगळी नावे भाजपा नेतृत्वाकडून विचारात घेतली जाऊ शकतात. महायुतीतील तीन पक्षांना सांभाळून ठेवण्याची क्षमता आणि मुख्यमंत्रिपदाचा असलेला अनुभव या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू असतील. त्यांनी शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला होता. निकालानंतरच्या समीकरणात फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.