Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील (Pratibha Patil) यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला; भारत निवडणूक आयोगाच्यावतीने गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये १५ व १६ नोव्हेंबर रोजी नमुना १२ ड भरुन दिलेल्या ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान नोंदवून घेण्यात येत आहे. त्यापैकी आज ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले ९१ जेष्ठ नागरिक तसेच ४ दिव्यांग मतदार असे एकूण ९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या प्रक्रियेकरिता विधानसभा मतदारसंघात एकूण आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे, पथकाच्यावतीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.