Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात ! पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

पुणे : Pune Crime News | दागिने खरेदी करण्याचा बहाणा करुन दुकानातील सेल्समनची नजर चुकवून हातचलाखीने दागिने चोरुन नेणार्‍या बंटी आणि बबलीला लष्कर पोलिसांनी (Lashkar Police) जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पुणे, मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

शेखर हेमराज वानी Shekhar Hemraj Wani (वय ३२, रा. शिवाजी पुतळा, मांजरी, हडपसर) आणि शिवानी दिलीप साळुंखे Shivani Dilip Salunkhe (वय २४, रा. केशवनगर, मुंढवा, मुळ रा. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कॅम्पातील एका दुकानात एक महिला व पुरुष आले. त्यांना कानातील टॉप्स घ्यायचे होते. दुकानातील सेल्समन हे त्यांना कानातील टॉप्स ट्रेमधून काढून दाखवित होते. त्यावेळी त्यांनी हातचलाखी करुन सेल्समनची नजर चुकवून २ टॉप्स स्वत:च्या हातामध्ये ठेवले. त्याचवेळी तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीने एक टॉप्स हातात घेऊन मोबाईल खिशामध्ये ठेवण्याचा बहाणा करुन १ टॉप्स खिशामध्ये ठेवला. दोघेही काहीही खरेदी न करता निघून गेले. ते गेल्यानंतर सेल्समन यांनी दुकानातील ट्रेमधील टॉप्स तपासून पाहिले असता ३ टॉप्स त्यामध्ये मिळाले नाही. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोघांनी हातचलाखी करुन ९५ हजार रुपयांचे ३ टॉप्स चोरुन नेलेले आढळून आले. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये ते टॉप्स घेऊन जाताना दिसून आले. बाहेरील सीसीटीव्ही पाहिले तर त्यात दोघे दुचाकीवरुन आल्याचे दिसून आले.

आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर महिला केशवनगर येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरी अचानक छापा घातल्यावर दोघेही तेथे मिळून आले. दोघांनीही चोरीची कबुली दिली. अधिक चौकशीत दोघांनी मिळून यापूर्वी पुणे शहरात २, मुंबई शहरात १, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १, सातारा १, पिंपरी चिंचवड शहरात २, ठाणे शहरात १ अशा वेगवेगळ्या ठिकाणी ९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, संदिप उकिर्डे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधरी, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, अल्का ब्राम्हणे यांनी केली आहे.