Sharad Pawar On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून शरद पवारांचे भाष्य; म्हणाले – “आम्हाला ते सहन करावं लागेल”

मुंबई : Sharad Pawar On Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) उद्धव ठाकरे प्रचार सभेसाठी वणीला जात असताना जवळच्या हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर उतरलं. हेलिपॅडवरच अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली. तसेच त्यांच्या ताफ्यातील इतर बॅग व वस्तू तपासण्यात आल्या. यावरून राजकारण चांगलच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकारावर वणीतील सभेत टीका करत सत्ताधाऱ्यांच्या बॅगा तपासण्याची हिंमत यंत्रणेने दाखवावी’, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ” आम्हाला जे कायदे लागू आहेत, ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना देखील लागू असले पाहिजेत. नरेंद्र मोदी, अमित शहा यांची येताना नव्हे, तर जातांना तपासणी करा. महाराष्ट्र लुटून ते नेत आहेत” असा घणाघात त्यांनी केला.
वाशिमच्या सभेत बोलताना ते म्हणाले, ” दाढीवाल्या मिंध्याची कधी तपासणी केल्याचं आम्ही पाहीलं नाही. दाढीवाल्या मिंध्याची, गुलाबी जॅकेटवाल्याची बॅग कधी तपासली नाही. तो तिसरा… तिसरा कोण?” यावर लोकांनी टरबूज, टरबूज अशी घोषणा दिली. त्यावर टरबुजाची कधी तपासणी केलीय का? म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दरम्यान आता या प्रकारावर जेष्ठ नेते शरद पवार यांनीही भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ” त्यांच्या हातात सत्ता आहे. सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवलं आहे. विरोधकांना त्रास देणं हाच सत्ताधाऱ्यांचा अजेंडा असल्याचं जाणवत आहे. आम्हाला ते सहन करावं लागेल.
परंतु, त्यावर नाराजी व्यक्त करणे देखील आवश्यक आहे. म्हणून मी माझी नाराजी प्रकट करत आहे. जे काही चाललंय ते सामान्य जनतेला दिसतंय. विरोधकांना ज्या प्रकारची वर्तणूक दिली जात आहे ते पाहून जनता देखील संतप्त आहे. मला वाटत नाही जनतेला हे काही आवडलं असेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.