Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान, मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ

Sunil-Shelke-Bapu-Bhegade-3

मावळ : Maval Assembly Election 2024 | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेळके यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील बंडखोर बापू भेगडे (Bapu Bhegade) यांचं आव्हान कडवं ठरत आहे.

पक्षाचा राजीनामा देऊन बापू भेगडे यांनी बंडखोरी करत शेळके यांच्यासमोर दंड थोपटले. बंडखोर बापू भेगडे यांना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाने या मतदारसंघात उमेदवार न देता बापू भेगडेंना पाठिंबा दिला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचा भेगडेंना पाठिंबा असणार आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मनसेकडून बापू भेगडे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

माझ्यासमोर महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून आव्हानच नाही, असं म्हणणारे सुनील शेळके आता अडचणीत आले आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात सहज निवडून येऊ अशी भाबडी आशा बाळगणाऱ्या सुनील शेळके यांना बापू भेगडे यांचे आव्हान मिळाल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ आली आहे.

मावळमधील अवघी भाजप भेगडे यांच्या पाठीशी असल्याचे बोलले जातेय. बैठक होऊन पक्ष पदाचा देखील अनेकांनी राजीनामा दिला होता. अनेकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतरही मावळमधील महायुती परिपूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे सुनील शेळके यांना सहज आणि सोपी वाटणारी निवडणूक अवघड असल्याचे पाहायला मिळत आहे.