Pune Crime News | अधिक पैशांच्या नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात वेश्या व्यवसायाला लावलेल्या 5 तरुणीची पोलिसांनी केली सुटका; दोघींच्या पतीनेच विकले वेश्या व्यवसायासाठी

पुणे : Pune Crime News | अधिक चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे सांगून पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावलेल्या ५ तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सुटका केली. या ५ तरुणींपैकी दोघींना त्यांच्या पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
सुमी सौरभ बिश्वास (वय ३५, रा. मरगी गल्ली, क्रांती चौक, बुधवार पेठ, मुळ रा. बोनगाव, जि. चातपाडा, कोलकाता), कुंटणखाना मॅनेजर विक्रम आसीम बिश्वास (वय २३, रा. मरगी गल्ली, बुधवार पेठ), किकास उजल मंडोल (वय २१), टॉनी युनुस मुल्ला (वय ३२) यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रिडम फर्म संस्थेचे प्रतिनिधी अब्राहम शशिकांत हेगडे, रेश्मा सुरेद्र तुपकर, सिमा अजय आरोळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संगिता जाधव, हवालदार रेश्मा कंक, सहायक फौजदार कुमावत, छाया जाधव, हवालदार नदाफ, भुजबळ हे बुधवार पेठेत गेले. अब्राहम याने वाड्यातील एक घर दाखविले. दरवाजात कुंटणखाना चालिका सुमी बिश्वास बसली होती. पोलिसांनी तेथे छापा घालून तपासणी केली. त्यात पाच तरुणी आढळून आल्या.
एकीने त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तिच्या मैत्रिणीकडून बुधवार पेठ (Budhwar Peth Pune) येथे काम केल्यास जास्त पेसे मिळतील असे सांगितले. त्यामुळे ५ महिन्यापूर्वी ती पश्चिम बंगालमधून येथे आली. दुसर्या तरुणीने सांगितले की, मुंबईत घरकाम करत असे, जादा पैशांच्या आमिषाने तिला येथे आणण्यात आले. तिसरी जयपूरहून येथे आली होती. चौथ्या तरुणीला तिचा पती टॉनी याने कुंटणखाना चालिकेला सांगून वेश्या व्यवसायाला लावले होते. पश्चिम बंगालमधील १९ वर्षाच्या तरुणीबरोबर विशाल मंडोल याने लग्न केले. त्यानंतर तो तिला गावाहून पुण्यात घेऊन आला व तिला वेश्या व्यवसायाला लावले. ग्राहकांकडून मिळणार्या ५०० रुपयांपैकी २५० रुपये सुमी बिश्वास व मॅनेजर विक्रम बिश्वास ठेवून घेत होते. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अजित जाधव पुढील तपास करीत आहेत.