Pimpri Chinchwad Politics | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं, आतापर्यंत 13 नगरसेवकांचे पक्षांतर

पिंपरी : Pimpri Chinchwad Politics | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) धामधुमीत होणाऱ्या पक्षांतरामुळे भाजपच्या (BJP) अडचणींत भर पडली आहे. पक्षाच्या १३ माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात सर्वाधिक आठ नगरसेवक भोसरीतील (Bhosari) आहेत.

पिंपरी चिंचवड वर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र ही सत्ता २०१७ मध्ये भाजपने उलथवून टाकली. राजकीय वातावरण बदलल्यानंतर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांनी अजित पवारांची साथ सोडून कमळ हाती घेतल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शहरात स्वतः लक्ष घातलं.

महापालिकेत भाजपची सत्ता आल्याने शहरातील पदाधिकाऱ्यांना राजकीय ताकद मिळाली. अमर साबळे यांना राज्यसभेची खासदारकी, तर उमा खापरे (Uma Khapre), अमित गोरखे (Amit Gorkhe) यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार केले. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे यांना महामंडळ देऊन राज्यमंत्री पदाचा दर्जाही दिला गेला. शहरात भाजप ताकदवान पक्ष झाला. चार आमदार असल्याने पिंपरी-चिंचवडही भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाऊ लागले.

महापालिकेतील पदांचे वाटप करताना मात्र काहींना पदे देता आली, तरी काहींना आश्वासन देऊनही ती देता आली नाहीत. त्यामुळे पाचच वर्षांत नाराजी वाढली. अशा नाराज माजी नगरसेवकांनी भाजपची साथ सोडण्यास सुरुवात केली आहे. काहींनी पद मिळूनही अधिकार दिले नाहीत, अशी तक्रार करून बाहेरचा रस्ता धरला आहे. आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे.

त्यात चिंचवड मधील माया बारणे, बाबा बारणे, तुषार कामठे, चंद्रकांत नखाते, चंदा लोखंडे यांचा समावेश असून, भोसरीतील सर्वाधिक आठ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.

त्यामध्ये वसंत बोराटे, संजय नेवाळे, लक्ष्मण सस्ते, प्रियांका बारसे, भीमाबाई फुगे, सारिका लांडगे, रवी लांडगे, एकनाथ पवार अशा आठ जणांनी भाजपला रामराम ठोकला. त्यातील रवी लांडगे आणि पवार यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. उर्वरित माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.