Complaint About Water Supply In Pune | पुणेकरांनो पाणी पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास ईमेल करा; न्यायालयातील याचिकेनंतर तोडगा निघाला

पुणे : Complaint About Water Supply In Pune | शहरातल्या काही उपनगरांमध्ये योग्य पद्धतीने पाणी पुरवठा होत नसल्याचं समोर आलं आहे. यावेळी पाणी पुरवठा विस्कळीत होणं, पाण्याचा प्रवाह कमी दाबाने येणं याशिवाय दूषित पाणी येणं अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहे. मात्र या तक्रारी नेमक्या कुठे कराव्यात, असा सवाल लोकांच्या मनात असतो. मात्र यावर आता तोडगा काढण्यात आला आहे.

अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पुणे शहरासह पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील गावांसाठी पाणी पुरवठ्याच्या तक्रारीसाठी ई-मेल आयडी तयार केला आहे. हा ई-मेल आयडी पाणी पुरवठा विभागाने जाहीर केला आहे.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसोबत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील गावांमधील पाणी पुरवठ्या संदर्भात वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशनसह अन्य काही संस्थांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएकडून पुरेसा पाणीपुरवठा केला जात नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने टँकर मागवून विकतचं पाणी घ्यावं लागत आहे, अशी तक्रार या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी महापालिकांचे आयुक्त तसंच पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांची समिती नेमण्यात आली आहे.

या समितीच्या बैठकीत नागरिकांना पाणी प्रश्नाबाबत येणाऱ्या अडचणी नोंदवण्यासाठी ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुणे महापालिकेने [email protected] हा ई-मेल आयडी तयार केला आहे. त्यावर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केलं आहे.